
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुटुंबियांना मोठे दुःख झाले असताना अशा घटनेचे राजकारण करणे म्हणजे सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. रोहित पवारांनी आरोपांचे धंदे आता तरी बंद करावेत, अशा कडक शब्दांत विखे पाटलांनी विरोधकांना सुनावले. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत ‘डीजीसीए’ला (DGCA) पत्र देऊन संपूर्ण चौकशीची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी असून, चौकशीतून सर्व तथ्ये समोर येतीलच. मात्र, दुःखाच्या काळात आधार देण्याऐवजी काही लोक जाणीवपूर्वक बुद्धीभेद करत असल्याची टीका त्यांनी केली. मुस्लीम आरक्षणावर स्पष्टीकरण मुस्लीम आरक्षणाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे आरक्षण रद्द करण्याची कोणतीही विशेष भूमिका सरकारची नव्हती. उच्च न्यायालयाने दिलेला विशिष्ट कालावधी संपल्यानंतर ते तांत्रिकदृष्ट्या आपोआप रद्द झाले आहे. इतर राज्यांमध्येही हे आरक्षण टिकले नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आरक्षणसंदर्भात अधिकाऱ्यांना इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर विखे पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांच्या भावनेचा आम्ही आदर करतो. आतापर्यंत 1.5 लाख कुणबी दाखले देण्यात आले आहेत. मात्र, संभाजीनगर विभागातील काही अधिकारी किंवा समिती सदस्य कामात सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी आहेत. जर आता दिलेल्या अंतिम सूचनांनंतरही कामात बदल झाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे तर सरकारची भूमिका काही वेगळी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. इतरांच्या वादात पडायचे नाही जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वैयक्तिक वादात पडण्याची आपली इच्छा नसल्याचे विखे पाटलांनी स्पष्ट केले. तसेच, सरसंघचालक मोहन भागवत हे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.