अजित पवारांचे CCTV फुटेज जारी करण्यास नकार:केंद्राने RTI अर्ज फेटाळला, कार्यकर्त्याची कोर्टात धाव; संशयाला वाव असल्याचा आरोप

अजित पवारांचे CCTV फुटेज जारी करण्यास नकार:केंद्राने RTI अर्ज फेटाळला, कार्यकर्त्याची कोर्टात धाव; संशयाला वाव असल्याचा आरोप
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी सातत्याने वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आता केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत अजित पवार यांचे मुंबई विमानतळावरील 28 जानेवारीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. यामुळे या प्रकरणी शंका घेणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने संशयाला वाव असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आरटीआय कायद्यांतर्गत नागरी उड्डयण मंत्रालयाकडे 28 जानेवारी 2026 रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. पण विभागाने ही माहिती देण्यास नकार दिला. यावर नितीन यादव तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाले नितीन यादव? नितीन यादव यासंबंधी म्हणाले, मी आरटीआय अंतर्गत अजित पवारांच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. या प्रकरणी वारंवार पाठपुरावाही केला होता. पण संबंधित विभागाने मी मागवलेली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे अजित पवारांचा खरोखरच घात झाला का? असा मोठा प्रश्न पडतो. या प्रकरणी मी आता अपिल केले असून, सुप्रीम कोर्ट व केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निर्णयाचा दाखला देत पुन्हा एकदा या फुटेजची मागणी केली आहे. तसेच मी या प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांकडेही मुंबई स्थित देवगिरी या शासकीय निवासस्थानापासून मंत्रालयापर्यंतचे मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडे असणारे 28 जानेवारीचे पहाटे 6 ते सकाळी 9 पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून घटनात्मक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी व शासकीय लोकसेवक होते. त्याचा दाखला देत केंद्रीय विमान वाहतूक विभागाने मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज नाकारले आहे. हे धक्कादायक असून, त्यांनी तत्काळ अजितदादांचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करावे अशी माझी मागणी आहे, असेही निती यादव यांनी म्हटले आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत अपघाताचा प्राथमिक अहवाल येणार? दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघातानंतर 30 दिवसांच्या आत प्राथमिक अहवाला सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था 28 जानेवारीपर्यंत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. सध्या ही संस्था या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, हवामानाचा अंदाज आणि वैमानिकाचे शेवटच्या क्षणांतील निर्णय यावर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. अधिकृत अहवालातून काय मिळणार माहिती? अजित पवारांच्या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या नजरा 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणाऱ्या AAIB च्या प्राथमिक अहवालाकडे लागल्या आहेत. या अहवालाद्वारे ब्लॅक बॉक्समधून मिळणारी विमानाची तांत्रिक माहिती आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा शेवटचा संवाद स्पष्ट होईल. त्यातून हा अपघात निव्वळ एक तांत्रिक त्रुटी होती की त्यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेले आहे, याचे उत्तर मिळेल.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart