
मधमाशांनी हल्ला केल्याने विद्यार्थी आणि पर्यटकांसह एकूण ४० जण जखमी झाल्याची घटना अजिंठा लेणीमध्ये बुधवारी (१८फेब्रुवारी) दुपारी घडली. मधमाशा हल्ला करत असलेल्या परिसरात दुपारी ३ ते ५ अशी या वेळेत २ तास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. जखमींमध्ये जपानच्या ७ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अजिंठा लेणीत कपारीला अनेक पोळी आहेत. मध्यंतरी ही पोळी भारतीय पुरातत्त्व विभागाने काढली होती. परंतु, मधमाशांनी पुन्हा पोळ बनवले. लेणी क्रमांक १० व २६ समोर मोठे मधमाशांचे पोळ आहे. बुधवारी लेणी क्रमांक १० समोरील पोळावरील मधमाशांनी दुपारी तीनच्या सुमारास पर्यटकांवर हल्ला केला. भीतीने पर्यटक सैरावैरा पळत सुटले होते. या मधमाशांनी १६ जपानी पर्यटकांवरही हल्ला केला. यातील ७ पर्यटक जखमी झाले. तसेच घनसावंगी तालुक्यातून सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांवरही मधमाशांनी हल्ला केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक असे १० जण जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी काही जणांनी लेणी क्रमांक १६ खालील स्वच्छतागृहाचा आधार घेतला होता. वर्षभरात १० हल्ले गेल्या वर्षभरात मधमाशांनी १० वेळा पर्यटकांवर हल्ले केले आहेत. यात शेकडो पर्यटक जखमी झाले आहेत. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर काही दिवस पर्यटकांची संख्या रोडावते. खबरदारी म्हणून १० जून २०२५ रोजी भारतीय पुरातत्त्व विभागाने वन विभागाचे पुणे येथील पथक बोलावून लेणी परिसरातील सर्व मधमाशांचे पोळ काढले होते.