74 वर्षीय रुग्णाचा घशाच्या कर्करोगावर प्रगत उपचारांनी विजय:गमावलेला आवाज पुन्हा मिळवला; स्वरयंत्रही वाचले

74 वर्षीय रुग्णाचा घशाच्या कर्करोगावर प्रगत उपचारांनी विजय:गमावलेला आवाज पुन्हा मिळवला; स्वरयंत्रही वाचले
पिंपरी-चिंचवड येथील ७४ वर्षीय रुग्णाने चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ओन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये प्रगत प्रिसिजन ऑन्कोलॉजी उपचारांमुळे त्यांना गमावलेला आवाज पुन्हा मिळवता आला, तसेच त्यांचे स्वरयंत्रही जतन करण्यात डॉक्टरांना यश आले. जनार्दन उमाळे (नाव बदललेले) यांना सुरुवातीला आवाज बसणे आणि मानेच्या उजव्या बाजूला वेदनारहित गाठ जाणवू लागली होती. त्यांनी या लक्षणांकडे काही काळ दुर्लक्ष केले. मात्र, तीन महिन्यांत त्यांचा आवाज अधिकच क्षीण झाला आणि मोठ्याने बोलणे कठीण झाल्याने त्यांना वैद्यकीय सल्ला घ्यावा लागला. रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत उमाळे यांच्या उजव्या पायरिफॉर्म सायनसमध्ये कर्करोग आढळला. हा कर्करोग स्वरयंत्रापर्यंत आणि जवळच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरला होता. सुदैवाने, तो शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचला नसल्याने अवयव जतन करणारी उपचारपद्धती वापरणे शक्य झाले. बहुवैद्यकीय तज्ज्ञ समितीने रुग्णासाठी मेडिकल केमो-रेडिएशनची शिफारस केली. त्यानुसार, त्यांना आधुनिक हेलिकल टोमोथेरपीसह सिस्प्लॅटिन केमोथेरपी देण्यात आली. कर्करोगावर पूर्ण नियंत्रण मिळवणे आणि रुग्णाचा आवाज वाचवणे हे या उपचारांचे मुख्य उद्दिष्ट होते. उपचारानंतर सुमारे १६ आठवड्यांत रुग्णाचा आवाज स्पष्ट झाला आणि मानेतील सूज पूर्णपणे कमी झाली. सध्या जनार्दन उमाळे नियमितपणे बोलू शकतात आणि पूर्वीसारखे सामान्य जीवन जगत आहेत. डॉक्टरांच्या मते, उपचारास विलंब झाला असता तर रुग्णाला कायमस्वरूपी आवाज गमवावा लागला असता. उपचारानंतर रुग्णाला मऊ आहार, गिळण्याचे व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, नियमित तपासणी आणि संतुलित जीवनशैलीचा सल्ला देण्यात आला आहे. उमाळे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “मी पुन्हा नीट बोलू शकेन असे वाटले नव्हते. आता कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतो.”

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart