राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी:पुणे काँग्रेसने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन केले

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी:पुणे काँग्रेसने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन केले
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाषण सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या राज आमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होते. यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न उपस्थित केल्याने भाजप अस्वस्थ झाली आहे. संसदेत निशिकांत दुबे यांनी वापरलेली भाषा पूर्णपणे चुकीची असून, ती कायद्याचे उल्लंघन आणि संविधानविरोधी भाजपची भूमिका दर्शवते, असे शिंदे यांनी म्हटले. शिंदे यांनी आरोप केला की, याच पार्श्वभूमीवर लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांचा हस्तक राज आमेरा राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देऊ शकतो. ते म्हणाले, ‘महात्मा गांधींना मारणारी विचारधारा हीच होती. नथुराम गोडसे तेव्हाही होता आणि आजही आहे, पण राहुल गांधी कोणालाही घाबरत नाहीत.’ देशहितासाठी आणि लोकहितासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या बाजूने उभे आहेत, त्यामुळेच भाजप आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचे संरक्षण करण्यास सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. या पसरवल्या जाणाऱ्या द्वेषातून राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागल्यास हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही, याची भाजपने नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, खजिनदार ॲड. अभय छाजेड आणि पुणे शहर उपाध्यक्ष प्राची दुधाने यांनीही निषेधपर भाषणे केली. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, वीरेंद्र किराड, सुनील मलके, मेहबूब नदाफ, अमीर शेख, सुनील शिंदे, राज अंबिके, नगरसेवक साहिल केदारी, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, द. स. पोळेकर, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सीमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्हाळ, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, कांचन बालनायक आदी उपस्थित होते.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart