लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

Written by

१० डिसेंबर २०२२
जन्म – १३ मार्च १९३३ (मुंबई)
निधन – १० डिसेंबर २०२२ (मुंबई)
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण या माहेरच्या कदम. हे कुटुंब मूळ कोल्हापूरचे, पण सुलोचना चव्हाण यांचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरात चाळसंस्कृतीत गेले. त्यांच्या आईचा व्यवसाय फुलविक्रीचा होता. सुलोचना या बालपणापासून नियमित असे गाणे शिकल्या नाहीत. त्या घरचा रेडिओ आणि ग्रामोफोन यांवरून जे काही कानावर पडेल ते तन्मयतेने ऐकून गात असत. त्यामुळे त्यांचे कोणी गुरू नाहीत; तसेच कोणी शिष्यही नाहीत.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना यांच्या घरचाच एक मेळा होता ‘श्रीकृष्ण बाळमेळा’. याच मेळ्यात त्यांच्या सोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत.
त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण त्या सुलोचनांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना या १९४६-४७ पासून हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करू लागल्या. ‘श्रीकृष्ण बालमेळ्या’ मधील रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळे संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे त्यांनी पहिले गाणे गायल्या. त्या‍वेळी तो चित्रपट हिंदी भाषेतील होता. त्याचे नाव होते ‘कृष्ण सुदामा’. ‘त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आपण फ्रॉक मध्ये गेलो होतो’ अशी आठवण सुलोचना सांगतात.
त्यानंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यांच्या नैसर्गिक आवाजाने अण्णासाहेब (सी. रामचंद्र), मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस.के. पाल, पी. रमाकांत, निसार बझ्मी, प्रेमनाथ, पंडित शामसुंदर यांच्या सारखे संगीतकार प्रभावित झाले. त्यांनी त्यावेळेस सी. रामचंद्र यांसोबत ‘जो बिगड गयी वो किस्मत हूँ, नजर से नजर लड गयी, जिगर में छूरी गड गयी, हाय राम’ अशी द्वंद्वगीते गायली. सुलोचना चव्हाण यांना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्या सारख्या आघाडीच्या गायका बरोबर पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्या सोबत ‘भोजपुरी रामायण’ मध्ये गीत गायले. सुलोचना या हिंदीतून मराठी चित्रपटात आल्या त्या ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे. त्याचे संगीतकार होते वसंत देसाई. सुलोचना यांनी त्या चित्रपटासाठी गायलेली लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली.
माईने १९५३-५४ च्या सुमारास ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी रचलेल्या काही लावण्या गायल्या. शामराव चव्हाण यांनी त्या चित्रपटाचे दिग्दुर्शन केले होते. पुढे शामराव यांच्या सोबत माईचे लग्न झाले आणि त्या सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. शामराव यांनी सुलोचनाबाईंना शब्दोच्चारांचे तसेच कुठल्या शब्दावर जोर द्यायचे त्याचे शिक्षण दिले. दिनकरराव अमेंबल यांनी सुलोचना यांना रेडिओवर गाण्याची संधी दिली. यंग इंडिया, कोलंबिया, ट्वीन, एच.एम.व्ही. या रेकॉर्ड कंपन्यांनी त्यांच्या आवाजात खाजगी ध्वनिमुद्रिका काढल्या. त्या बेगम अख्तरच्या गझला, सुंदराबाईच्या बैठकीच्या लावण्याही त्याच ढंगाने गात असत.
सुलोचना यांनी मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषा मध्ये भजन, गझल असे विविध प्रकार गायले आहेत. त्यांच्या गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. ही सुलोचना यांच्या आयुष्यातील महत्त्वाची आठवण. सुलोचना यांचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना मोठे आश्चर्य वाटले होते. सुलोचना यांच्या आवाजाची योग्य दखल फक्त रेडिओ सिलोनने घेतली होती. त्यांची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी हे रेडिओ सिलोनमुळे संगीत श्रोत्यांना कळले. पाकिस्तान, बलुचिस्तान, ब्रह्यदेश इतक्या दूरदेशांतून श्रोते तिच्या गाण्यांची फर्माईश देत असतात. सुलोचना चव्हाण यांच्या गायन कारकिर्दीला १९५५ मध्ये अनपेक्षित वळण मिळाले. निर्माता व दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी ‘कलगीतुरा’ या तमाशापटाची निर्मिती केली. कथा पटकथा, संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे. सुलोचना यांनी पार्श्वगायन केलेला तो दुसरा मराठी चित्रपट. यातील त्यांचा ग्रामीण ढंगातील गावरान बाज जनतेला भावला आणि सुलोचना यांची लावणी गायिका म्हणून ओळख निर्माण झाली.
रणजीत देसाई यांच्या तबलजींच्या जीवनावरील कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्त्वावर ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची निर्मिती १९६२ मध्ये केली. अरुण सरनाईक त्या चित्रपटाचा नायक होता. सर्वांच्या आवडीचा मालमसाला म्हणून त्या चित्रपटात लावण्या, गझला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते. लावणीत वसंत पवार यांचा हात कुणी धरू शकत नसे. ‘रंगल्या रात्री अशा’ मध्ये त्यांनी गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रथम संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या आणि त्या लावण्यांचे चित्रिकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीवर केले. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता ‘नाव गाव कशाला पुसता? अहो, मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची.’ कोल्हापूरच्या गीतकार व नायका प्रमाणेच लावणी गायिकाही कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी सुलोचना यांच्याकडून गाऊन घ्यायची असे ठरवले. वसंतराव सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी मुंबईला जाऊन भेटले. त्या भेटीचे वर्णन करताना सुलोचना चव्हांण म्हणतात,
मी घरात होते. अचानक दार वाजले, मी दार उघडले, बघते तर बाहेर गबाळ्या कपड्यातील, केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे. मी म्हणाले, “आपण कोण?” ते म्हणाले, “मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना? तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायची आहे.” मी थक्कच झाले. साक्षात वसंत पवार, मराठीतील एवढे मोठे नामवंत संगीतकार, माझ्या दारात उभे. त्यांनी खिशातून कागद काढला. त्यांनी घडी घातल्यामुळे पार चुरगाळल्या गेलेल्या त्या कागदावरची लावणी वाचून दाखवली. दुपारच्या भोजनाची वेळ झालेली होती. मी त्यांना “जेवणार का?” म्हणून विचारले. वसंतरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते सद्गदित आवाजात म्हणाले, “लोकांनी आज पर्यंत मला फक्त पिणार का? म्हणून विचारले. तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का? असे कुणीच विचारले नाही.’’
‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपट मुंबईला मॅजेस्टिक मध्ये लागला होता. तबलावादक अल्लारखॉ, नर्तिका मिनू मुमताज, गायक छोटा गंधर्व, गायिका आशा भोसले व सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कलाकौशल्याने बोलपटात अक्षरश: नवरंग उधळले होते. पडद्यावर राधाबाई बुधकरांच्या संगीत बारीचे चित्रण बघताना प्रेक्षक अस्सल तमाशाचा अनुभव घेऊन धुंद होत. गायन-वादन, ताल-सुर, गळा-हात यांचा इतका सुरेख मिलाफ ‘रंगल्या रात्री अशा’ पूर्वी क्वचित झाला असेल. कथा-पटकथा लेखक रणजीत देसाई, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार वसंत पवार व सुलोचना चव्हाण हा यशस्वी फॉर्म्युला अनंत माने यांच्या ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही होता. त्या चित्रपटाद्वारे माया जाधव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यातील सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या, ‘कसं काय पाटील बरं हाय कां?’ व ‘सोळावं वरीस धोक्याचं गं’ या दोन लावण्यांनी कहर केला. महाराष्ट्रभर त्या लावण्या गाजल्या.
‘सवाल माझा ऐका’ चा रौप्य महोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या आर्यन टॉकिज मध्ये १० एप्रिल १९६५ रोजी थाटामाटात साजरा झाला. त्याच कार्यक्रमात अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना ‘लावणी सम्राज्ञी’ हा किताब बहाल केला. राम कर्वे व राम देवताळे यांच्या ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाची कथा पटकथा संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेली होती. वसंतरावांनी दोन तासांत त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या. ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. त्यातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ आणि ‘फड सांभाळ तुर्याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा’ या दोन लावण्यांचे ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते. लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या, की त्या ऐकायला ध्वनिमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांतारामबापूंना घेऊन आले.
सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार, संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१० चा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार. आपले पती वसंतराव गेल्याचा फार मोठा धक्का सुलोचना चव्हाण यांना बसला होता. त्या काही काळ मुक्या झाल्या होत्या. त्यांनी गाणी गायली नाहीत, पण नंतर सुलोचना चव्हाण यांच्या ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पानं’ या सारख्या काही लावण्या गाजल्या.
सुलोचना चव्हाण यांचे ‘माझं गाणं माझं जगणं’ हे आत्मचरित्र आहे. सविता दामले यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे. सुलोचनाबाईंच्या बालपणापासूनच्या आठवणींनी त्यांच्या कहाणीची सुरुवात होते. शालेय जीवन, स्टुडीओच्या चकरा, अभिनय, गाण्याचे वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचे आयुष्य, लावणी, हिंदी गाणी, लोकप्रियता, वाहवा अशा टप्प्या मधिल प्रवास पुस्तका मधून समोर येतो. त्याच बरोबर तो काळही समोर उलगडतो.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares