२१ डिसेंबर २०२२
नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामुग्री उपलब्ध ठेवावी. डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग पुरेसा ठेवावा. नवीन रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करताना आधीच्या रुग्णालयातील स्टाफची पळवापळवी करु नये. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयासारख्या आशियातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या रुग्णालयात एका तरुणीला व्हेंटीलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. तिचे आई-वडील अंबूबॅगचा फुगा दाबून तब्बल वीस तास तिला कृत्रीम श्वासोच्छवास देत होते. तरीही त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाची स्थिती सुधारण्यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी अजित पवार यांनी केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे तसेच व्हेंटीलेटर अभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
Your email address will not be published.

Article Tags:
news