२४ डिसेंबर २०२२
खासदार संजय राऊत यांनी सीमावादावरून एकनाथ शिंदेंवर केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादावर काहीच बोलत नाहीत. ते शेपूट घालून बसलेत, अशी टीका राऊतांनी केली. संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात एवढा मोठा उठाव केला. त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. तेव्हा आम्हाला फिरू देणार नाही, अशा धमक्या मिळाल्या. पण तेव्हाही आम्ही शेपूट घातलं नाही. सर्वत्र वाघासारखं फिरलो. आताही वाघासारखं फिरतोय. मुख्यमंत्र्यांनी काय करावं, हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाला दीड शहाण्याची गरज नाही. हा दीड शहाणा माणूस केव्हाही उठेल, काहीही भुंकेल, याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री बांधील नाहीत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाची सीमावादाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणतंही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सूज्ञ माणसांनी त्यावर बोलायचं नसतं. पण जे गाढव, नालायक असतात… ते वायफळ बडबड करतात. त्याची आम्ही दखल घेत नाही अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. राऊतांचा एकेरी उल्लेख करत गायकवाड पुढे म्हणाले, राहिला प्रश्न शेपूट घालायचा, तर १०० दिवस तुरुंगात राहून संजय राऊत बाहेर आल्यानंतर, मी मोदींना भेटणार, मी फडणवीसांना भेटणार, असं म्हणत होते. खरं तर, शेपूट तोच घालत होता. आता पंधरा दिवसांत त्यांची वळवळ परत सुरू झाली आहे. तेव्हा शेपूट घालून त्याने अगदी सरेंडर केलं होतं. आता एवढी मस्ती का आली?
Your email address will not be published.

Article Tags:
news