०३ डिसेंबर २०२२
पिंपरी
पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ निधी उपलब्ध करून देणार असे ठरलेले असताना, अचानक त्यात बदल करून तो प्रकल्प आता पालिका स्वत: राबवित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल ३२१ कोटींची निविदा पालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केली आहे. प्रशासकीय राजवटीत बदलेल्या भूमिकेबद्दल आणि इतक्या मोठ्या प्रमाणातील खर्चाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. त्यातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पालिका राबवित आहे. मुळा नदीचा प्रकल्प पुणे पालिका राबवित असून, त्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका निधी उपलब्ध करून देणार होती. पालिका हद्दीत वाकड बायपास ते बोपखेल असे एकूण १४.४० किलोमीटर असे मुळा नदीचे एका बाजूचे काठ आहे. त्यात पिंपळे निलख,दापोडी, बोपखेल येथे संरक्षण विभागाचा भाग आहे. सल्लागारांच्या आराखड्यानुसार या कामासाठी ७५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुणे पालिका राबविणार होती. त्यासाठीचा खर्च पिंपरी-चिंचवड पालिका पुण्यास देणार होती. तसा मागील पंचवार्षिकेत तसा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेचा हा संयुक्त प्रकल्प मोडित काढत प्रशासकीय राजवटीत अचानक तो निर्णय बदलण्यात आला. प्रत्यक्ष निविदा काढण्याच्या वेळी पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेने स्वतंत्रपणे निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र निविदा काढण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची २७सप्टेंबरला आणि पालिका सभेची ४ ऑक्टोबरला मान्यता दिली आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news