महापौर परिषदेच्या पुरस्कारने राष्ट्रवादीसह विरोधकांना मोठी चपराक !

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ एप्रिल २०२२
पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकाळात कामे झाली नाही, विकास झाला नाही. अनागोंदी कारभार झाला, असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधकांना मोठी चपराक बसली आहे, अशी टीका भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.
माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा घणाघात
याबाबत पवार यांनी प्रसिद्घीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापौर परिषद परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येत असतो. यासाठी प्रश्नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येत असते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येत असते. सन २०१८-१९ या वर्षात विविध महापालिकांनी केलेल्या कामांची माहिती महाराष्ट्र महापौर परिषद आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मागविण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देखील यात सहभाग घेत आपण केलेल्या कामांची माहिती पाठवली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिका अव्वलस्थानी !
राज्यात सध्या २७ महानगरपालिका आहेत. त्यापैकी ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या तीन महापालिका समोवश ब-वर्गात आहे. ठाणे येथे शिवसेनेची आणि नाशिकमध्ये भाजपाची सत्ता होती. शिवसेनेला धोबिपछाड देत पिंपरी-चिंचवडमधील भाजपा सत्ताकाळात महापालिका प्रशासनाने दमदार कामगिरी केली आहे. राज्यातील २७ महानगरपालिका, २२० नगरपालिका आणि १२ नगरपरिषदा अशी मिळून महापौर परिषद असते.
महापालिकेच्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी लक्षवेधी…
महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय नियोजन, राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, ऑनलाईन सेवा सुविधा, केंद्र आणि राज्य शासनाच्या महानगरपालिकांसाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी, विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडाचा विकास, पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मल:निसारण योजनांची सर्व भागात केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कच-यापासून खत आणि वीज निर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम, कौशल्य विकास योजना, दिव्यांगासाठी राबविण्यात आलेल्या योजना, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा आदी विविध स्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे ब वर्ग महानगरपालिकांच्या गटातपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेले आरोपांचे राजकारण पिंपरी-चिंचवडकरांच्या लक्षात आले आहे. राज्यपातळीवर शहराचा आणि महापालिकेचा लौकीक होत असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी आरोपांचा भडीमार करणे, न्याय्य नाही, असे म्हणावे लागेल, असा टोलाही एकनाथ पवार यांनी लगावला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares