मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना कायद्यात बदल करण्याची विनंती केलीये – उपमुख्यमंत्री अजित पवार

Written by

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्य शासनाची कायमच भूमिका राहिली असून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली असून प्रसंगी कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढविण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासकीय परंपरेनुसार आज उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार युवराज संभाजीराजे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत किल्ले शिवनेरी गडावर उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्य शासनाची भूमिका – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता शिवरायांचा हा वारसा जतन करण्यात येईल असे आश्वासन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तत्पूर्वी शिवजन्मस्थळी मंत्री मोहदयांनी पारंपारीक पद्धतीने बाल शिवाजींचा पाळणा हलविला. याप्रसंगी रोशना बुट्टे पाटील, उर्मिला बुट्टे पाटील, सुवर्णा ढोबळे, रोशनी घोणे, मिनिषा कोरे, श्रृतिका बुट्टे पाटील यांनी पाळणा गीताचे गायन केले. याप्रसंगी पोलीस पथकाच्या बँड वर राष्ट्रगीत सादर करून शिवजन्मस्थळ आलं मानवंदना देण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या वतीने तिन बंदूकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. लेझीम पथकाने अतिशय सुंदर लेझीम प्रकार सादर केले. शिव जन्मस्थळापासून शिवकुंज मंदिरात छत्रपतींच्या पालखीची पारंपारीक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते शिवकुंज येथे बाल शिवाजी व माँसाहेब जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने सायली कोंडे व निशा कोंडे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. याप्रसंगी आयोजीत करण्यात आलेल्या सभेमध्ये दुर्गसंवर्धक प्रा.विनायक खोत यांना शिवनेर भूषण व जेष्ठ साहितीक व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक स्व. डॉ. अनिल अवचट यांना मरणोत्तर छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्व. अवचट यांच्या कन्या मुक्ता पुनतांबेकर यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जन्नरची रत्ने या टपाल तिकीटांचे अनावरण करण्यात आले. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्या भाषणादरम्यान मराठवाड्यातील युवक योगेश केदार या तरुणाने विचारलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर बोलताना अजित पवार म्हणाले,अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचे आरक्षण देता येणार नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण फेटाळण्यात आले. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून लोकसभेत वाढीव आरक्षणा बाबतचा कायदा मंजूर करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी शिवछत्रपतींनी जतन केलेल्या जुन्नरच्या हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळण्या बाबत केलेल्या मागणीसाठी प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी डॉक्टर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,उप वनसंरक्षक जयरामे गौडा, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. दरम्यान शासकीय कार्यक्रम होईस्तोवर व मंत्री महोदय जाईपर्यंत किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या संख्येने शिवभक्त घोषणा देत आम्हाला तात्काळ किल्ल्यावर पाठवा अशी मागणी करत होते. मराठा सेवा संघाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय घोगरे, सूत्रसंचालन रूपेश जगताप यांनी केले. राजेंद्र बुट्टे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

Article Categories:
All News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares