बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Written by

रोहीत खर्गे
विभागीय संपादक
३१ मे २०२२
पिंपरी-चिंचवड
 
बैलगाडा शर्यत लढ्यात आमदार महेश लांडगे यांचा सिंहाचा वाटा
राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या त्याचे श्रेय आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे श्रेय आहे. ‘‘बैल पळू शकतो…’’ असा अहवाल आम्ही तयार केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैलागाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावगाडा, शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता जीवाची बाजी लावू पण बैलगाडा शर्यत कदापि बंद होवू देणार नाही, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर नितीन काळजे आणि माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने टाळगाव चिखली येथे भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली. शर्यतीच्या अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले.
यावेळी श्रीक्षेत्र नारायणपूरचे प. पु. अण्णा माऊली महाराज, आमदार राहुल कुल, प्रसाद लाड, समाधान अवताडे, नितेश राणे, सुनील शेळके, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी आमदार नरेंद्र पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे आणि पदाधिकारी, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पंजाब बैलगाडा संघटनेचे निर्मल सिंग, हरियाणाचे पवन कुंडू, पुणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रसिद्ध गाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. अहोरात्र मेहनत घेवून महेशदादा यांनी मंत्रालय, सर्वोच्च न्यायालात परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१७ पर्यंत एकाही राज्यकर्त्याने बैलगाडा शर्यत सुरू व्हावी. याकरिता राज्य शासनाचा एक रुपयाही खर्च केला नाही. खंडोबाची शप्पत घेवून सांगतो… फडणवीस यांनी प्रत्येक सुनावणीला होणारा सुमारे २०लाख रुपयांचा खर्च कसा उभारायचा? असा प्रश्न होता. त्यावेळी फडणवीस यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर आम्ही बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. पण, फडणवीस यांनी कधी श्रेय घेतले नाही.
सुमारे २० हजार शौकीनांनी अनुभवला शर्यतींचा ‘फायनल’ थरार
फडणवीस यांना श्रेय मिळू नये यासाठी राजकारण केले?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर कायदा तयार केला. मात्र, या कायद्याला अजय मराठे या व्यक्तीने न्यायालयात आव्हान दिले. त्या मराठेच्या पाठिशी कोण होते? असा सवाल उपस्थित करीत केवळ फडणवीस यांना श्रेय मिळू नये. याकरिता काही लोकांनी राजकारण केले, अशी टीकाही आमदार महेश लांडगे यांनी केली.
फडणवीस आणि लांडगे यांचे योगदान : संदीप बोदगे
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे म्हणाले की, राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मदत केली. राज्यातील सर्वच पक्षांचा बैलगाडा शर्यतीला विरोध नव्हता. पण, सर्वाधिक मदत देवेंद्र फडणवीस आणि महेश लांडगे यांनी केली. बैलगाड्याचे चाक आणि ग्रामीण अर्थकारण याचा अतूट संबंध आहे. राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने बैलगाडा सुरू करण्याबाबत कायदा केला. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी फडणवीस यांनी पुढकार घेतला. या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी न्यायालयात तज्ज्ञ वकीलांची नेमणूक करुन त्याचा खर्च राज्य सरकारने करावा, असा मोठा निर्णय घेतला. तसेच, बैलांची धावण्याची क्षमता अहवाल तयार करण्यासाठी समितीची नियुक्ती केली. या समितीच्या अहवालामुळेच सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा खटला लढवण्यास मदत झाली. तसेच, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन बैलांना संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहनही फडणवीस यांना केले.
बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् तेपण नांगरासकट : फडणवीस
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सूटाबुटात दिसणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैलगाडा शर्यतीला कुर्ता-जॅकेट आणि पायजमामध्ये दिसले. या नव्या पोषाखाचे गुपितही फडणवीसांनी जाहीरपणे सांगितले. आमदार महेश लांडगे यांनी आग्रह करुन खास बैलगाडा शर्यतीसाठी मला कपडे शिवून दिली आणि घालायला लावली. ‘‘शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत, कारण त्याला पळायचे असते. मात्र, मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला महेशदादांनी लावले..’’अशी मिश्कील टीपण्णीही फडणवीस यांनी केली. त्यामुळे बैलगाडा घाटात फशा पिकला. याबाबत फडणवीस यांनी केलेल्या पेहरावावरुन एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला आज तुम्ही आणि महेशदादांनी एकसारखा पेहराव का केला आहे? त्यावर मी म्हणालो की, ‘‘मुळशी पॅटर्नचा डायलॉग माहिती आहे का? तर बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि तोपण नांगरासकट…’’हा नांगर कुणासाठी…तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे, असा इशाराही फडणवीस यांनी घाटात दिला. त्यामुळे घाटात एकच जल्लोष पहायला मिळाला.
बैलगाडा शर्यतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी…
महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या बैलगाडा शर्यतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मोशी येथील युवा उद्योजक निखिल बोऱ्हाटे यांच्या पुढाकाराने टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू असलेल्या बैलगाडा घाटावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शेतकऱ्यांचा ‘सेलिब्रेटी’असा बैलांचा उल्लेख बैलांचा सन्मान करण्यात आला. घाटावर सुमारे २० हजार बैलगाडा प्रेमी उपस्थित होते. भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी ओळख निर्माण झालेल्या या शर्यंतीवर आता हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्यामुळे इतिहासातील अशी पहिलीच बैलगाडा शर्यत म्हणून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
बैलगाडा शर्यतींचा उशीरापर्यंत थरार…
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीच्या अंतिम फेरीत तुफान चुरस झाली आहे. कार्यक्रमाला फडणवीस यांनी उपस्थित राहून काही गाड्यांचा थरार अनुभवला. मात्र, गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे उशीरापर्यंत शर्यत चालू राहिली. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरणाची माहिती सविस्तर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *