पुणे मेट्रो तर्फे रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे आणि रस्ता दुभाजकांच्या सुशोभिकरणाला सुरुवात

Written by

दि. २७/१२/२०२२
पुणे
पुणे : पुणे मेट्रोने पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक या उन्नत मार्गावरील रेनवॉटर हार्वेस्टिंग व दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मेट्रोची कामे सुरु असल्याने अद्यापपर्यंत ही कामे हाती घेण्यात आली नव्हती. ती आता जवळपास पूर्ण झाल्यामुळे ही दोन्ही कामे मेट्रोने हाती घेतली आहेत.
मेट्रोच्या २ खांबामधील अंतर साधारणतः २५ ते ३० मीटर असून त्याची रुंदी २ ते २.२५ मीटर आहे. पुणे मेट्रोच्या व्हायाडक्टची रुंदी ८ मीटर असून लांबी २५ किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत गेले तर मोठ्या प्रमाणावर भूमिगत जल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यासाठी पुणे मेट्रोने व्हायाडक्टच्या दोन खांबांमध्ये (एक सोडून एक) रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी उपाययोजना केली आहे. पावसाचे पाणी डाऊन पाईपद्वारे सेटलींग चेंबरमध्ये आणून तेथून फिटर व बोरवेलद्वारे जमिनीत सोडले आहे. पुणे महानगरपालिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच धर्तीवर रस्ते दुभाजकांमध्ये चांगली माती टाकून झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे सुशोभीकरणाचे काम करताना मेट्रोवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून वाहतूक बेटांच्या (ट्राफिक आयलँड) धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोने निविदा काढल्या होत्या. वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि सिव्हिल कोर्ट स्थानक ते रामवाडी स्थानक येथील निविदा मान्य करून त्याचा कार्यादेश एका कंपनीला देण्यात आला आहे. दुभाजकांच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथे २ जाहिरात फलक लावण्याची मुभा त्या कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. याव्यतिरिक्त त्या कंपनीला शहराच्या महत्वाच्या ठिकाणी चौकांमध्ये मेट्रो खांबावर व्हर्टिकल गार्डन करण्यास सांगण्यात आले आहे. दुभाजकांमधील झाडे, लॉन व व्हर्टिकल गार्डन याची देखभाल कंपनीला ५ वर्षेपर्यंत करावयाची आहे. अश्या प्रकारच्या नियोजनामुळे दुभाजक/रस्ता सुशोभीकरणाबरोबरच मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्नदेखील मिळणार आहे. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, ‘पुणे मेट्रो पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बांधील आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि पुण्याचा बराचसा भाग दाट झाडीने व्यापला आहे. त्याला सुसंगत म्हणून मेट्रोने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सुशोभीकरणाचे कार्य हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भरच पडणार आहे.’
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares