०३ डिसेंबर २०२२
पुणे
पुण्याच्या पाणीप्रश्नावरून पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही. सत्ता बदलली तरी अधिकाऱ्यांची तीच उत्तरे आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीही केले जात नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळेत ही पाणी गळती रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
पुणे महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेची कामे केली जात आहेत. यामध्ये ८४ पाण्याच्या नवीन टाक्या आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाण्याचे मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. तरीही पाण्याची गळती कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानभवन येथे पाण्याच्या गळतीसंदर्भात बैठक पार पडली.
बैठकीत झालेल्या चर्चेवर अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले. ‘अधिकाऱ्यांकडून पाणी प्रश्न आणि गळतीवर तोडगा काढण्यासाठी काहीही केले जात नाही. प्रत्येक वेळी तीच उत्तरे दिली जातात. सत्ता बदलली तरीही अधिकाऱ्यांची उत्तरे कायम आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळेत ही पाणी गळती न रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,असे पवार म्हणाले. महापालिका आयुक्तांनी ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याचे ‘रेकॉर्ड’वर कबूल केले आहे. जलवाहिन्या, कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे महापालिकेला २१ टीएमसी पाणी घ्यावे लागते. त्यामुळे हे पाणी महापालिकेच्या खात्यावर पडते. पुणेकर इतके पाणी वापरत नसताना त्यांच्यावर चुकीचा आरोप होतो. मात्र, यात केवळ अधिकाऱ्यांची चूक आहे, असा दावा पवार यांनी केला.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news