धार्मिक आरोप – प्रत्यारोप, राजकीय दंगा थांबवून श्रमिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे रविवारी भव्य ‘कामगार अस्तित्व रॅली’

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० एप्रिल २०२२
पिंपरी
कोरोना महामारीत श्रमिकांचे सर्वाधिक हाल झाले. महामारीचा भांडवलदार, उद्योगपतींनी मोठा गैरफायदा घेतला. ६० टक्के कायमस्वरुपी कामगारांना देशोधडीला लावले. कंत्राटीकरण फोफावले. कामगारांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाईवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. या प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी धार्मिक आरोप-प्रत्यारोप, राजकीय दंगा केला जात आहे. हे सर्व राजकारण थांबवून श्रमिकांचे, मध्यवर्गीयांचे हित व देशाचा विकास हा ध्यास घ्यावा यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कामगारदिनी (दि.१) भव्य ‘कामगार अस्तित्व रॅली’चे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.
पिंपरीत आज (शुक्रवारी) झालेल्या पत्रकार परिषदेला श्रमिक आघाडीचे शशांक इनामदार, दिपक पाटील, दिनेश पाटील, अहमद खान, संतोष टाकळे, कृष्णा शिर्के, करण भालेकर, विठ्ठल ओझरकर, हनुमंत जाधव, संजय साळुंखे, जाकीर मुलानी, आबासाहेब खराडे, जयवंत फुलकर, दशरथ वाघ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहिती
याबाबत बोलताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, ”कोरोना महामारीत दोन वर्षे गेले. कोरोना काळात कामगार वर्ग पिचला. पण, कोरोनामुळे आंदोलन करता येत नव्हते. निर्बंधांमुळे कामगार चळवळीची मोठी हानी झाली. कोरोना महामारीचा उद्योजकांनी गैरफायदा घेतला. ६० टक्के कायमस्वरुपी कामगारांना देशोधडीला लावले. आयटी, इंजिनिअरिंग, ऑईल अशा विविध विभागातील कामगार बेरोजगार झाले. एकीकडे प्रचंड महागाई आणि दुसरीकडे नोकरी नाही, अशा कात्रीत कामगार सापडला. कोरोनात कामगारांना कामावरुन काढू नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही अनेकांना कामावरुन काढले. न्यायालयाचे आदेश देखील उद्योजकांनी पाळले नाहीत”.
”कोरोनाचा फायदा घेऊन कायमस्वरुपी कामगारांच्या जागी कंत्राटी कामगार घेतले. त्यांच्याकडून १२-१२ तास काम करुन घेत त्यांची पिळवणूक सुरु केली. आठवड्याची सुट्टी देखील दिली जात नाही. कामगारांचे अस्तित्व संपत चालले आहे. १ मे १८८६ रोजी अमेरिकेत कामगार दिनाची सुरुवात झाली. कामगारांच्या कामाचे तास निश्चित करण्याबाबत मोठी चळवळ झाली होती. या लढ्यास १३३ वर्षे पूर्ण झाले. पण, आजही अनेक आस्थापनांमध्ये श्रमिकांना हक्कारिता लढावे लागते. कामगार प्रथा लोप पावत चाचली आहे. कंत्राटी कामगार नियमन व निर्मुलन कायदा 1970 हा अस्तित्वात आला. तेव्हापासून देशात शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, कारखाने, उद्योगामध्ये कायमस्वरुपी कामगारांच्या जागी ठेकेदारांमार्फत कामगार भरती करण्यात आली. ठेकेदार कामगारांना १२ तास राबवून घेतात. पण, किमान वेतन देत नाहीत. भविष्य निर्वाह निधी, साप्ताहिक, शासकीय नियमानुसार  सणाच्या सुट्ट्या, वैद्यकीय उपचाराची सुविधी दिली जात नाही. श्रमिकांचे 133 वर्षे पाठीमागे गेल्याचे चित्र सध्या महाराष्ट्र व देशात दिसून येत असल्याचे”ही यशवंतभाऊ भोसले म्हणाले.
 श्रमिक, बेरोजगारी, महागाईचे प्रश्न संपले की काय?
वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, सोशल मिडीयावर केवळ धार्मिक आरोप-प्रत्यारोप, राजकीय दंग्याच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. त्यामुळे देशातील, राज्यातील कामगार, श्रमिक शेतकरी, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगारी, महागाई, सर्व सामान्य या सर्वांचे प्रश्न जवळपास संपुष्टात आले आहेत की काय? असा संतप्त सवालही भोसले यांनी केला. राजकीय पक्ष, नेत्यांच्या बातम्यांवरुन देश अधोगतीकडे चाललेला दिसून येत आहे. जाती, धर्माचे राजकारण सुरु आहे, असेही ते म्हणाले.
असा आहे ‘कामगार अस्तित्व रॅली’चा मार्ग
देशवासीयांचे अस्तित्व दिसावे. धार्मिक राजकारण थांबवावे. श्रमिकांचे, मध्यवर्गीयांचे हित व देशाचा विकास हा ध्यास घ्यावा याकरिता कामगार दिनाच्या दिवशी  भव्य ‘ कामगार अस्तित्व रॅली ‘  काढण्यात येणार आहे. १ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयात ध्वजारोहन केले जाईल. त्यानंतर तेथून रॅलीला सुरुवात होईल. कै. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा-संत तुकारामगर पोलीस चौकी समोरुन – नेहरुनगर चौक-कामगारनगर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पिंपरी चौक-कामगारनगर-नेहरुनगर-संत तुकाराम महाराज पोलीस चौकीसमोरुन संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान येथे समारोप येईल. या ठिकाणी रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. सुमारे ३०० दुचाकी, टेम्पो, ट्रक, कार, अॅटो या वाहनांच्या माध्यमातून २ हजार कामगार या रॅलीत सहभागी होणार असल्याचेही यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares