दि. ०६/०१/२०२३
लोणावळा
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर ताजे गावच्या हद्दीत ट्रकचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला कामशेत पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून आरोपींकडून 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे एकूण 14 मोबाईल फोन आणि 690 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
अनिल तुकाराम वाघमारे (वय 20), नवनाथ संतोष वाघमारे (वय 20), अनिल बारकु वाघमारे (वय 22), नवनाथ तुकाराम वाघमारे (वय 20, सर्व रा. मुंढावरे ता. मावळ, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांचे साथीदार मुस्तफा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), दत्ता पवार (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), मंग्या (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही, सर्व रा. भाजगाव, ता. कर्जत, जि. रायगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ताजे गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंप परिसरात मंगळवार 27 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणारे दोन ट्रक चालक आपल्या ट्रकमधील हवा चेक करत असताना आरोपींनी दोन्ही ट्रक चालकांना व त्यापैकी एका ट्रकमधील एका प्रवाशी महीलेस आणि तिच्या पतीस गंभीर मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले होते.
गुन्हा दाखल होताच लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासोबत पोलीस पथकाची विभागणी करुन घटनास्थळी व परिसरात या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी गस्त सुरु केली. त्यानंतर या परिसरात संशयास्पदस्थितीत आरोपींना गुन्हा घडल्यापासून 24 तासात ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार समीर शेख, जीतेंद्र दिक्षीत, रविंद्र राय, पोलीस नाईक प्रविण विरणक, सचिन निंबाळकर, हनुमंत वाळुंज, नितीन कळसाईत, बाळासाहेब गावडे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष झगडे, शरद खाडे, रविंद्र राऊळ, अमोल ननवरे यांच्या पथकाने केली.
Your email address will not be published.

Article Tags:
news