०९ डिसेंबर २०२२
विकसित राष्ट्रांनी प्रदूषण करायचे, पर्यावरणाला धोका निर्माण करायचा आणि हे नुकसान इतर देश भरून काढणार. हे धोरण योग्य नाही. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करून शाश्वत विकास केला केला पाहिजे या धोरणावर भारतात होणाऱ्या जी २० परिषदेत चर्चा केली जाणार आहे, असे भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
जी २० परिषदेबाबत केंद्र सरकारचे सुरू असलेले नियोजन यासंदर्भात सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हवामान बदल, कोरोनाची साथ, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळ माजला असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवड्यामुळे जगातील गरिबांचे जगणे बिकट झाले आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विस्कळित झाल्या आहेत. अशा स्थितीस तोंड देण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल. सहमतीतून समस्या सोडविण्याचा मार्ग भारत जगाला दाखवेल.
नैसर्गिक स्त्रोतांवर सर्वांची समान मालकी आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सूत्रानुसार, लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम या सांस्कृतिक मूल्याची ओळख जगाला करून दिली जाईल. ‘युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार’ ही पंतप्रधानांची भूमिका या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली असून त्यासाठी जागतिक पातळीवर जनमत उभे केले जाईल.
जी २० चे २० सदस्य असले तरी भारताने स्पेन, नेदरलँड, इजिप्त, बांगलादेश, ओमान यासह इतर देशांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. एकूण ४३ देशांचे प्रतिनिधी पुढील वर्षभरात भारतात येणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर, पुणे येथेही बैठका होणार आहेत.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news