गेल्या दोन वर्षातील कामांमुळे कर्मचारी महासंघाच्या निवडणूकीत ‘आपला महासंघ पॅनलचा’ विजय निश्चित : अंबर चिंचवडे

Written by

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची पदाधिकारी निवडणुक शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) होणार आहे.  मागील दोन वर्षांपुर्वी ११ जानेवारी २०२० ला प्रथमच लोकशाही मार्गाने निवडणु झाली. यामध्ये कर्मचा-यांनी एक ऐतिहासिक कौल दिला व एक विचाराच्या आपला महासंघ पॅनलला निवडून दिले. त्याच्या माध्यमातून कर्मचा-यांच्या हिताचे असणारी सर्व कामे सहकाऱ्यांच्या मदतीने पुर्ण केली आहेत. या गेल्या दोन वर्षातील कामांमुळे ‘आपला महासंघ पॅनलचा’ विजय निश्चित आहे असा दावा पॅनल प्रमुख व कर्मचारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बुधवारी (दि. २३ फेब्रुवारी) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चिंचवडेंबरोबर ‘आपला महासंघ पॅनलचे’  सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी चिंचवडे यांनी सांगितले की, महासंघाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेतील जवळपास १०२ पदोन्नतीच्या आदेशातून ६२८ कर्मचारी, अधिकारी यांना पदोन्नतीचा लाभ मिळवून देण्यात आला. यापूर्वी आपल्या महानगरपालिकेत क्वचितच कुणाचे तरी प्रमोशन झाले अशी कधीतरी बातमी ऐकायला मिळायची. परंतु माहे मे २०२० पासून आपल्या महानगरपालिकेत पदोन्नतीची रांग लागली. गेल्या दीड वर्षात वर्ग १ ते वर्ग ४ मधील सर्वांनाच याचा लाभ झाला आणि हे सर्व कर्मचारी महासंघाच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच झाले. गतकाळात असलेले कामगारांचे नेतृत्व कसे कुचकामी होते. किंबहुना त्यांना दूरदृष्टी नसल्याचे अधोरेखित झाले. स्वत:ला काहीच फायदा मिळणार नसल्याने इतरांचे भले करण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता नसल्याचे दिसून आले. कारण आपल्याच महानगरपालिकेमध्ये पहिलं प्रमोशन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना २६-२७ वर्षे वाट पाहावी लागली हीच मोठी शोकांतिका आहे. काही कर्मचारी, अधिकारी ज्या पदावर कामावर रुजू झाले. त्याच पदावर त्याच पदावर सेवानिवृत्त व्हावे लागले. तसेच पदोन्नती न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी एक सल कायमचीच राहिली. तसेच सातव्या वेतन आयोगातील निर्देशानुसार १०/२०/३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचा-यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये १० वर्षे पूर्ण झालेल्या ८०२ कर्मचारी, अधिकारी यांना याचा फायदा झाला आहे.
कोरोनासारख्या महामारीचा सामना करत असताना सर्वच कर्मचाऱ्यांना पहिल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये १५० रुपयेप्रमाणे ६५ दिवसांचा प्रोत्साहन भत्ता मिळवून दिला. तसेच दुस-या लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी यांना अनुक्रमे पाच, दहा, पंधरा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवण्यात महासंघ यशस्वी झाला. याशिवाय महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश देण्यात येतो. महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कोट्यवधी रुपये खर्च करते त्याचा हेतू हा की कर्मचाऱ्यांना चांगला गणवेश मिळाला पाहिजे. त्यामुळे गणवेशापोटी देय असणारी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली व त्या रकमेमध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ केली असा कर्मचारी हिताचा दूरगामी निर्णय घेण्यात आला, त्यामध्ये ठेकेदारालाही आळा घातला आणि महानगरपालिकेचाही फायदाच झाला आहे.

कोरोनाच्या काळामध्ये पुणे महापालिकेप्रमाणे एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे अशी महासंघाच्यावतीने आग्रही मागणी करण्यात आली होती व प्रशासनानेही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तात्काळ ती मागणी मान्य केली होती. त्याचा लाभ मनपातील ५२ कर्मचारी जे कोरोनाने मयत झाले त्यांच्या कुटुंबियांना झाला. ४६ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पंचवीस लाख व ६ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पंच्याहत्तर लाख व त्यांच्या वारसांना महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झालो. सहकाऱ्यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार देण्याचे काम खऱ्या अर्थानं केल्याचे समाधान आहे.तसेच मागील वर्षी बोनसचा करार संपला होता नव्याने करार करण्याचे एक मोठे आव्हान होते.
महानगरपालिकेचे बिकट असणारी आर्थिक परिस्थिती पाहता बोनस मिळणे एक कसोटी होती परंतु सर्वांच्या सहकार्याने तसेच आशीर्वादाने यामध्ये यश प्राप्त झाले. गतकाळातील महासंघ पदाधिकाऱ्यांनी चुकीचे समर्थन केलेले सेवानियम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. त्याच्याविरोधात अनेक हरकती घेऊन त्यामध्ये कर्मचारी हिताचे आमूलाग्र बदल करण्याचे काम महासंघाच्या माध्यमातून  करण्यात येणार आहे निश्चितच त्यामध्ये यश मिळणार असून कर्मचा-यांवर झालेला अन्याय दूर होणार आहे. तथापि राज्य शासनाकडून आदेशांची अंमलबजावणी प्रशासनास चुकीच्या पद्धतीने करण्यास लावून ‘लाड पागे समितीच्या’ शिफारशीनुसार सफाई संवर्गातील कर्मचा-यांमध्ये फूट पाडून त्यांच्या वारसांच्या नोकरीवर गदा आणण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. त्याला महासंघाच्यावतीने प्रखर विरोध करण्यात आला. राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सामाजिक न्यायमंत्री यांना पत्र तसेच समक्ष भेटून याबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबत लवकरच एक चांगला निर्णय होणार आहे. या व्यतिरिक्त मागील काळात विमा कंपनीचे हस्तक बनून कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्याचा घाट गतकालीन पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु मा. औद्योगिक न्यायालयात याबाबत महासंघाची बाजू वरचढ असल्याने त्यामध्ये संघटनेला यश मिळाले व गेली दीड वर्ष मा. औद्योगिक न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. हे संघटनेचे फार मोठे यश आहे. कारण गतकाळात झालेल्या कोरोना सारख्या महामारीने अनेकांचे संसार उध्वस्त केले. त्यामध्ये आपल्या व आपल्या कुटुंबियांना फक्त धन्वंतरीनेच वाचवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत असताना त्यामध्ये एक चांगल्या कामगार भवनाचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील एक चांगली वास्तू उभारण्याचा प्रयत्न त्यामध्ये करण्यात आला आहे लवकरच त्याचे उद्घाटन करून कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी खुले केले जाणार आहे. महासंघाच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीची सामना करत असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कामगार हिताची कामे करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या सहकार्याने केला व तो निश्चितपणे सर्वच कामगारांच्या हिताचा आहे याबाबत आमच्या मनात काही शंका  नाही. कामे करत असताना अनेक अडचणी आल्या व त्यावरील आमच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर मात करू शकलो. यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेच पाहिजे कारण चांगल्या कामासाठी चांगल्या विचारांची माणसे सोबत असणे गरजेचे त्याच्यामध्ये सर्वांचा सर्वांगीण विकास घडतो अशाच विकासाच्या अनेक योजना कर्मचाऱ्यांसाठी घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत. एका चांगल्या विचारांचा सुसंस्कृत व्यक्तींचा सुशिक्षित उमेदवारांच्या पॅनल आपणासमोर घेऊन आलोय त्यामध्ये ६० टक्के नवीन कार्यकर्त्यांना व २५ पैकी १६ पदवीधर उमेदवार आणि ३ महिला उमेदवार प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाकरीता ७ उमेदवारांना नव्याने संधी दिली आहे. उद्याच्या काळातील कामगार प्रतिनिधी घडवण्याचा त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा चांगल्या विचारांच्या व्यक्तींना कर्मचारी चांगले काम करण्यासाठी संधी देतील अशी खात्री आहे व दिनांक २५ फेब्रुवारी रोजी होणा-या महासंघ निवडणुकीमध्ये कपबशी चिन्हावर शिक्का मारून आपल्या महासंघ पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा ठाम विश्वास आहे.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares