खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवजयंती कर्नाटकात केली साजरी

Written by

समाजकंटकांनी विटंबना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना थेट कर्नाटकात मानवंदना दिली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील रणधीर सेनेच्या गुंडांनी बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची विटंबना केल्याची सल खासदार डॉ. कोल्हे यांच्या मनात होती. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर जाण्याऐवजी बंगळुरू येथे जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर ऐतिहासिक गारद (शिवगर्जना) देऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह काल रात्री उशिरा बंगळुरू येथे दाखल झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत असून या दैवताचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे जिथे त्यांची विटंबना करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला, तिथे जाऊन सन्मानपूर्वक मानवंदना देऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या कृतीतून समाजकंटकांना जणू इशारा देत खऱ्याअर्थाने आपण छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याचे दाखवून दिले आहे. खासदार डॉ. कोल्हे यांनी मानवंदना देण्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना मानवंदना देण्यासाठी विलंब झाला. मात्र यंदा प्रथमच कर्नाटक सरकारच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाल्याचे स्थानिक शिवप्रेमींनी निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
विटंबना झालेल्या बेंगळूरु येथील महाराजांच्या पुतळ्यासमोर पहाडी आवाजात दिली गारद (शिवगर्जना)
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रफुल्ल तावरे, डॉ. घनःश्याम राव याच्यासह महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. त्याचबरोबर बंगळुरू मधील शिवप्रेमींनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणे ही क्लेशदायक बाब आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकार समर्थनीय नाही. त्यामुळेच या ठिकाणी येऊन जाहीरपणे गारद (शिवगर्जना) करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यानुसार अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. तसेच या स्थानिक पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले.

Article Categories:
Braking News · Entertainment · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares