इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या ५५ वर्षांत पाहिलेलं नाही – संजय राऊत

Written by

०७ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गंभीर बनला असून आता दिल्लीमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात अमित शाह यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसची तोडफोड केल्याच्या काही घटना समोर आल्यानंतर त्यावरून वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार लाचार आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे.
शिंदे असतील किंवा फडणवीस, कारभार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवं. सीमाभागात २४ तासांपासून सरकारी प्रेरणेनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होतायत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीला जातायत. पण काय उपयोग आहे? महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं. अशी वेळ महाराष्ट्रावर कधी आली नाही. इतके हतबल मुख्यमंत्री, इतकं लाचार सरकार महाराष्ट्रानं गेल्या ५५ वर्षांत पाहिलेलं नाही. काल दोन मंत्र्यांनी शेपूट घातलं. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.
कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? त्यांना भाई म्हटलं जातं. त्यांनी भाईगिरी दाखवावी ना. मग कसले भाई तुम्ही? भाई काय, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनीटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आज हा प्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं महाराष्ट्रातलं सरकार गेलं खड्ड्यात, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.
यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची, सीमांची काळजी नाही. १०५ हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली. पण सरळ हे सीमा कुरतडतायत. सरकार मात्र षंढासारखं आणि नामर्दासारखं बसलंय. हे नामर्द सरकारच आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. तीन महिन्यांपासून सरकारने महाराष्ट्राचं दिल्लीतल्या दारातलं पायपुसणं करून टाकलं आहे”, असंही राऊत म्हणाले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares