रोहित खर्गे
विभागीय संपादक
२७ डिसेंबर २०२२
थेरगाव
मुलांच्या शालेय वाटचालीत खेळांना अतिशय महत्त्व आहे. शालेय जीवनात कोणता ना कोणता खेळ मुलांना आला पाहिजे. अभ्यास तर कराच, पण आनंदी आणि निरोगी जीवनासाठी खेळांनाही महत्त्व द्या. करोना काळात मुले मोबाइलच्या अधिक जवळ गेली. त्यांची ऊर्जा खर्च झाली नाही, त्यांना खेळायला मिळाले नाही तर मुलांची मने आनंदी आणि प्रसन्न राहत नाहीत. मोबाईलच्या युगात खेळ मागे पडू नयेत, यासाठी शाळांमध्ये मुलांच्या कला आणि क्रीडागुणांना वाव दिला तरच मुलांना खेळातही करिअरच्या नव्या वाटांचा शोध घेता येईल. असे मत प्रेरणा शिक्षण संस्थेचे मानद सचिव कांतिलाल गुजर यांनी व्यक्त केले. ते थेरगाव येथील प्रेरणा विद्यालयात आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धा उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत, प्रेरणा शिक्षण संस्थेचे मानद सचिव कांतिलाल गुजर, उद्योजक रवींद्र माने, प्रेरणा बँकेचे संचालक अक्षय गुजर, प्राचार्य शिवाजी ननावरे व सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश सावंत म्हणाले की, मुलांना ज्या क्रीडाप्रकारात करिअर करायचे आहे, त्यांनी निवडलेल्या खेळाची सखोल माहिती घेतली पाहिजे. चांगल्या प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेतले पाहिजे. व्यायाम, जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य या गोष्टी असतील तरच स्वप्न पूर्ण करता येऊ शकते.
क्रीडाशिक्षक रमेश कदम यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी स्वागत केले. दत्तात्रय उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. समर्थ कुंभार या विद्यार्थ्याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
Your email address will not be published.

Article Tags:
news